औरंगाबाद : एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद मतदारसंघात भाजपला नेते, कार्यकर्तेच मिळत नव्हते. गेल्या दहा वर्षांत परिस्थिती पालटली आहे. आता या मतदारसंघात भाजपचा प्रभाव चांगलाच वाढला आहे. या वाढत्या ताकदीचा प्रत्यय कालच्या सभेत दिसून आला. शहारत कमला का बटन दबओ नंतर आता या सभेत लावलेल्या पोस्टरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर कमळाचे चिन्ह आणि भारतीय जनता पार्टी असा उल्लेख चर्चेचे ठरले आहे. हे पोस्टर भाजपच्या चाणक्षपणाचा नमुनाच असल्याची चर्चा रंगली आहे.
गजानन महाराज चौकात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. या सभेत भाजपने आपली ताकद दाखवून दिली. सेनेवर छाप पाडण्याची एकही संधी भाजपच्या धुरिणांनी सोडली नाही. शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार सभा असली तरी सभेच्या प्रारंभापासून ते अखेरपर्यंत मतदारांच्या मनात भाजप आणि भाजपच कोरला गेला यात शंका नाही. शिवसेनेतर्फे खैरे यांनी भाषण केले मात्र बाजी मारली ती शहानवाज हुसेन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनीच ! सभेत भाजपच्या नेत्यांची अन झेंड्यांची गर्दी दिसून आली. सभोवती लावलेल्या पोस्टरवर फिर एक बार मोदी सरकार चे नारे कमळाचे चिन्ह नजरेत भरणारेच होते. एका पोस्टरने मात्र सेनेला विचार करायला भाग पाडले. चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर कमळ आणि भारतीय जनता पार्टी असे लिहिलेले होते. त्यामुळे खैरेंना भाजपने हायजॅक केले काय ? अशी चर्चा सभास्थळी रंगली होती.